जालन्यात मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही, असं बोललं जात आहे. याबाबत एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (३ सप्टेंबर) बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “खुद्द देवेंद्र फडणवीस लेह लडाखमध्ये लष्कराच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत. अजित पवारही या कार्यक्रमाला येणार होते, मात्र काल (शनिवार, २ सप्टेंबर) रात्रीपासून त्यांना ताप आहे. त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते या ठिकाणी आले नाहीत. त्यामुळे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका.”
“आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही”
“मी जाहीर सांगितलं आहे की, आमच्यात कुठलीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना यश मिळणार नाही,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
“मराठा मोर्चे निघाले तेव्हा त्याला मुका मोर्चा म्हणण्यात आलं होतं”
मराठा मोर्चावरील लाठीचार्जवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “जेव्हा मराठा मोर्चे निघाले तेव्हा त्याला मुका मोर्चा म्हणण्यात आलं होतं. हे सगळं सर्वसामान्य मराठा माणसाला माहिती आहे. मी एवढंच सांगतो की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही.”
हेही वाचा : “ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीमार सुरू झाला त्यावेळी मुंबईत…”; संजय राऊतांचं मोठं विधान
“आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देईन”
“सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करेन. हे आरक्षण मिळेपर्यंत योजना आणि इतर लाभ मराठा समाजाला मिळत राहतील. याशिवाय आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचंही काम करेन,” असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं.