मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, मंत्रिमंडळात शिंदे गटातून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या आमदार संजय राठोडांचा समावेश झाल्याने जोरदार टीका होत आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस, चिंत्रा वाघ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी तत्कालीने ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं. आता त्याच राठोडांना आपल्या मंत्रिमंडळात घेतल्याने विरोधक आक्रमक झालेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टकरण देत आपली भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. यानंतरही कुणाचे काही विचार असेल, म्हणणं असेल तर नक्की सांगा, ते ऐकून घेतलं जाईल. लोकशाहीत प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.”
“…म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश”
“सर्वांना माहिती आहे की, पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. त्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
चित्रा वाघ यांनीही घेतला आक्षेप
संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. त्यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.
चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोड आणि तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर तीव्र आगपाखड केली होती. मात्र, एकीकडे त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली असताना आता देवेंद्र फडणवीसांनी कधीकाळी उद्धव ठाकरेंवर या प्रकरणावरून केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. यामध्ये संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करतानात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जाब विचारला होता.
पूजा चव्हाण प्रकरणावर काय म्हणाले होते फडणवीस?
सर्व पुरावे असतानाही काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप फडणवीसांनी १ मार्च २०२१ रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. ते म्हणाले होते, “पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता.”
हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या १८ नेत्यांना संधी? वाचा…
“मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढंच सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं? पण एवढं झाल्यावरही जर कोणाला साधूसंत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं”, असं फडणवीस म्हणाले होते.