राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये गुरुवारी एकनाथ शिंदेंच्या बंडामागील सूत्रधार भाजपा आहे की नाही या विषयावरुन मतमतांतरे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर याच विषयावर आज अजित पवारांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय. राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार टीकवण्यासाठी सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बैठकींचे सत्र सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पार पडलेल्या एका बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर त्या विषयावर बोलण्याची माझी लायकी नाही, असं म्हटलं आहे. मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार यांनी हे विधान केलंय.
नक्की वाचा >> एकनाथ शिदेंच्या बंडासंदर्भात बोलता बोलता अजित पवारांना आठवला पहाटेचा शपथविधी; म्हणाले, “मी जेव्हा शपथ घेतली…”
एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडासंदर्भात पत्रकारांशी चर्चा करताना अजित पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली. एकनाथ शिंदे म्हणालेत की आमच्या पाठी महाशक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं कोणती ही पार्टी असू शकते? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी, “मला काही वाटत नाही. कालच आमचे नेते शरद पवार यांनी सांगितलं. मी महाराष्ट्रापुरतं बघतो. सर्व प्रसारमाध्यमांना माहित आहे की महाराष्ट्रासंदर्भात काही असेल आणि त्यावर आपण बोललं पाहिजे असं वाटलं तरच अजित पवार पूर्ण माहिती असल्यावर बोलतो,” असं अजित पवारांनी सांगितलं.
नक्की वाचा >> “तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे ३६ आमदार नेले, आता कसं वाटतंय?”; मुंबईत मनसेची शिवसेनेविरोधात बॅनरबाजी
तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी, “महाराष्ट्राबाहेर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यासाठी आमच्या पक्षातर्फे प्रफुल्लभाई असतील, सुप्रिया सुळे असतील, पवार साहेब असतील हे लोक बोलत असतात,” असंही सांगितलं.
नक्की पाहा >> Video: संघर्ष शिगेला! एकनाथ शिंदेंच्या बॅनरवर शिवसैनिकांनी फेकली शाई, अंडी
पुढील प्रश्नामध्ये पत्रकारांनी नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नारायण राणेंनी म्हटलंय की पवारांनी आमदारांना धमक्या देऊ नये, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असता अजित पवारांनी पत्रकाराला वाक्य पूर्ण होऊ देण्याआधीच थांबवलं. “एक मिनिटं. मी नेहमी सांगत असतो की पवार साहेब आमचे दैवत आहेत. सर्वोच्च नेते आहेत. साहेबांनी एखादं वक्तव्य केल्यानंतर त्याबद्दल प्रतिक्रिया देणं ही माझी लायकी नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही,” असं अजित पवार पत्रकाराचं वाक्य अर्ध्यात तोडत म्हणाले.