सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नियत नकली आणि बुद्धीही नकली असा टोला लगावला.
शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे, छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>मला धमकी देणाऱ्यामागे ‘या’ नेत्याचा हात; वसंत मोरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले, “१५ दिवसांपूर्वी…”
शिवरायांनी अफजलखान संपवला ती वाघनखे ही महाराष्ट्राची शान आहे. आजचा दिवस राज्यासाठी प्रेरणादायी आहे. मात्र विरोधी पक्ष अशा कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत आहेत. या बहिष्काराचे उत्तर शिवप्रेमी मावळे निश्चित देतील, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
वाघनखांवर कोणीही विवाद करू नये. या रोगाचा सामना आजचा नाही. छत्रपतींच्या काळातही तो होता. मात्र अत्यंत चाणाक्षपणे हा विरोध मोडून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आज कोणाच्या बुद्धीला गंज चढला असेल, तर मुख्यमंत्र्यांनी तो काढावा. वाघनखे हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे निदर्शक आहेत. त्याच्यावर कोणी शंका घेऊ नये.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
काहीजण चांगल्या कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवरायांचा इतिहास यापुढील पिढीला कळला पाहिजे. अर्थसंकल्पामध्ये महिला आणि शेतकरी यांना आधार देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, तरी पण विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. यापुढेही महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे. हे सरकार शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे आहे. त्यामुळे कोणाचीही गय करणार नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.-अजित पवार, उपमुख्यमंत्री