मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. जयंत पाटलांनी रविवारी (११ सप्टेंबर) दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलू दिलं नाही, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला. तसेच ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’ असं म्हणत टोला लगावला. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमधील पैठणच्या सभेत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राचे सुपुत, देशाचे सरन्यायाधीश यांचा सन्मान होता. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या सोहळ्याला उपस्थित राहिलो. तो उच्च न्यायालयाचा कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. विरोधी पक्षनेत्यालाही निमंत्रण दिलं होतं. त्याचं उत्तर अजित पवार यांनी जयंत पाटलांना दिलं आहे. या महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदावर बसतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. त्यावर पण टीका करण्यात आली.”
“किती कद्रुपणा, किती संकुचित वृत्ती”
“जयंत पाटील म्हटले त्या सोहळ्याला जायला नको होतं. अरे, आम्ही गेलो नाही, त्यांनी निमंत्रण दिलं होतं आणि आमच्यासाठी ती अभिमानाची बाब होती. कारण महाराष्ट्राचा भूमिपूत्र देशाचा सरन्यायाधीश झाला आहे. किती मोठी बाब आहे. मात्र, किती कद्रुपणा केला जात आहे. किती संकुचित वृत्ती आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “जुन्या चित्रपटात एक गाणं होतं, ते खूप प्रसिद्ध झालं होतं. ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’ दिल्लीत काय झालं? जयंत पाटलांनी अजित पवारांना बोलू दिलं नाही. त्यानंतर अजित पवार रागारागाने निघून गेले. कारण जयंत पाटलांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं, परंतु ते काही होता आलं नाही.”
हेही वाचा : “…त्यामुळे एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही”, पैठणच्या सभेत एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी
“महाराष्ट्रात अजित पवारांना थांबवता येत नाही, म्हणून दिल्लीत थांबवलं”
“विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांची ‘दादागिरी’ काम करून गेली. त्याचं शल्य जयंत पाटलांच्या मनात होतं. महाराष्ट्रात अजित पवारांना थांबवता येत नाही, म्हणून दिल्लीत थांबवलं. मला त्यात पडायचं नाही, ती त्यांची अंतर्गत बाब आहे,” असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.