दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. एकनाथ शिंदेंनी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. नव्या संसदेला विरोध म्हणजे विरोधकांची पोटदुखी आहे, अशी टीका त्यांनी केली. ते शुक्रवारी (२६ मे) औरंगाबादमधील कन्नड येथे शासन तुमच्या दारी अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “आपल्या संसद भवनाचं उद्घाटन करायचं आहे. याला विरोध केला जातो आहे. संसद भवन हे पवित्र मंदिर आहे. तिथं सगळे खासदार बसतात, लोकांना न्याय देतात. प्रश्न मांडतात. मोदींनी २०१९ मध्ये जे स्वप्न पाहिलं ते २०२३ ला पूर्ण करण्याचं काम केलं. हे ऐतिहासिक काम आहे. त्याला काय विरोध करता. ही पोटदुखी आहे, हा पोटसूळ आहे.”
“…म्हणून विरोधकांना पोटदुखी होत आहे”
“एवढं मोठं काम कमी वेळात झालं. त्यामुळे याचं मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांना पोटदुखी होत आहे. याआधी राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनीही अशी उद्घाटनं केली. तेव्हा कुणीही विरोध केला नाही. कारण हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“मोदी सरकार आल्यानंतर गरीबाचं जीवनमान बदललं”
मोदी सरकारच्या कामावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मोदी सरकारआधी काँग्रेसची जी सरकारं होती त्यांनी गरीबाला गरीबच ठेवण्याचं काम केलं. परंतु २०१४ मध्ये मोदी सरकार, शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आल्यानंतर गरीबाचं जीवनमान बदललं. चुलीच्या ऐवजी गॅस आला, घराघरात पाणी आलं, महिला भगिनींसाठी मोठ्या योजना सुरू झाल्या.”
हेही वाचा : विश्लेषण : झोपडीवासियांना अडीच लाखांत घर देणे का शक्य?
“मोदींची लोकप्रियता देशात नाही, जगात क्रमांक १ ला आहे”
“सर्वसामान्य माणसाला गरीबातून वर काढण्याचं काम मोदी सरकारने केलं. म्हणूनच त्यांची लोकप्रियता देशात नाही, जगात क्रमांक १ ला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.