“वर्षा गेले अडीच वर्ष बंद होतं. सहा सात महिन्यांपासून लोक वर्षावर येत आहेत. वर्षावर आल्यानंतर लोकांना चहा-पाणी द्यायचं नाही का? आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालत नाही. पण चहापाणी देऊ शकत नाही का? आज अजित पवार यांनी चहापाण्याचा हिशेब काढला. मग आम्हाला सांगा तुम्ही ७० हजार कोटी सिंचनासाठी पाण्यात घातले. तरीही शून्य पॉईंट जमीन सिंचनाखाली आली नाही. हे मी म्हणत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण आणि कॅगनेच म्हटले आहे. शेवटी त्याचाही हिशेब द्यावा लागेल. कुठे घसरता याचा विचार करा? सात महिन्यात महिन्याला चाळीस लाखांचा खर्च झाला. ज्यावेळी फेसबुक लाईव्ह सुरु होतं, तेव्हा वर्षा बंगल्याचा महिन्याचा खर्च तीस ते पस्तीस लाख होता. ही माहिती अजित पवारांनी घ्यायला हवी होती. आता तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहोत. याचे साक्षीदार माध्यमातील लोक आहेत, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली.
काय म्हणाले होते अजित पवार?
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवाल अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये आले. एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का?” असा खोचक सवाल पवार यांनी केला.
अजित पवारांनी स्वतःच्या सोशल मीडियासाठी सहा कोटींची तरतूद केली
“सरकारी जाहीरातीबद्दल ते बोलले. आम्ही जाहीरातीवर खूप खर्च करत असल्याचं अजित पवार म्हणाले. पण त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री असताना २४५ कोटींचे नियोजन त्यांच्या जाहीरांतीसाठी केलं होतं. तसेच त्यांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला सहा कोटींची तरतूद केली होती. पण बोंबाबोंब झाल्यानंतर तरतूद गुंडाळली. स्वतःचा प्रचार करायला सहा कोटी? असं खोटं नाटं काम आम्ही करत नाही. माझं कुटुंब, माझी जबाबदारी, यावर किती खर्च केले त्यांनी? आम्ही महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानत आहोत. फक्त आपलं कुटुंब नाही पाहत. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी अशोकपर्वातून मोठी जाहीरात केली होती. त्या तुलनेत आम्ही कमीच खर्च केले आहेत. सात महिन्यात फक्त ५० कोटी आम्ही जाहीरातींवर खर्च केले. पण दिल्ली, पंजाब, तेलंगना किती जाहीराती देत आहेत, त्याचा हिशेब करा. त्या तुलनेत महाराष्ट्र काहीच खर्च करत नाही. लोकांपर्यंत काम पोहोचवणे चुकीचे आहे का?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
बरं झालं ते आमच्यासोबत चहापानाला आले नाहीत
आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, अशी टीका विरोधकांनी केली आहे. मला त्यांना सांगायचा आहे की, दाऊदची बहिण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला. त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरं झालं अजित पवारांसोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली. कारण महाराष्ट्र द्रोह मोठा की देशद्रोह मोठा? सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे अजित पवार वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी मानसिकता आम्ही समजू शकतो. मासा पाण्याविना तडफडतो, तशी सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर विरोधकांची अवस्था झाली आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.