राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावांचाही विचार करा, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगवला आहे. ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले, त्यांना लाडकी बहीण योजना काय कळणार? असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं म्हणाले एकनाथ शिंदे?
“काही लोकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, मग लाडक्या भावाचं काय? असं काही जणांनी विचारलं. मात्र, ज्यांना सख्खे भाऊ कधी समजले नाही, त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार?” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
पुढे बोलताना, आम्ही लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावांचादेखील विचार केला आहे, असेही ते म्हणाले. “जे तरुण विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधत आहेत, त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पहिली नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यातील १० लाख विद्यार्थांना याचा फायदा होणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे”, असं त्यांनी सांगितले.
“आमच्या निर्णयामुळे अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आहे”
“आम्ही अन्नपूर्ण योजना सुरू करून महिलांची चिंता दूर केली आहे. त्याबरोबरच आम्ही मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आम्ही पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीनाही अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. विरोधकांनी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही प्रतिक्रिया दिली होती. “राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करु, पण लाडक्या बहिणीबरोबरच लाडका भाऊ योजना सुद्धा सरकारने आणावी, असे ते म्हणाले होते. तसेच महिला आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांना समान न्याय द्या”, असं त्यांनी म्हटलं होतं.