राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या दोन दिवशीय अधिवेशनात धडाकेबाज भाषण केले. मुख्यमंत्री म्हणून सभागृहातील आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रस, राष्ट्रवादीसोबत सत्तेत असताना होत असलेल्या घुसमटीबद्दल भाष्य केले. तसेच माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात होता, असेदेखील शिंदे म्हणाले होते. याच भाषणाचा आधार घेत आज शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला. अजून खूप काही सांगायचे आहे, वेळ आली तर याचा आणखी उहापोह करेन, असे शिंदे म्हणाले आहेत. ते पंढरपुरात सभेत बोलत होते.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदे यांनी नेमकं सांगितलं, म्हणाले…

“जो अनुभव अडीच वर्षात आला त्याची चर्चा जाहीरपणे करु शकत नाही. सभागृहातील भाषणात मी थोडेच सांगितले आहे. अजून खूप काही सांगायचे बाकी आहे. वेळ आणली तर नक्कीच त्याचा उहापोह करेन. मी कोणावरही टीका करत नाही. खालच्या पातळीवर जाऊन कधी बोलत नाही. मी कमी बोलतो, जास्त ऐकतो. काम जास्त करतो. जी संधी मिळाली आहे, या संधीचं सोनं करायचं आहे. या संधीचा अपयोग राज्यातील विकासासाठी करायचा आहे. मला अभिमान वाटतो की, पुण्यामध्ये विमानतळावर उतरल्यानंतर पंढरपूरकडे येताना स्वागतासाठी रस्त्याने दुतर्फा लोक उभे होते. हे प्रेम विकत घेता येतं का?” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> मुंबई : शाहू महाराज की स्वातंत्र्यवीर सावरकर? छात्रभारतीच्या मागणीनंतर विद्यापीठाच्या वसतीगृह नामकरणावरुन वाद पेटण्याची शक्यता

तसेच, “अडीच वर्षातील कारभार आपण पाहिलेला आहे. करोना सर्वांनाच झाला होता. सरकारलाही झाला होता. परंतु आता होणार नाही. अडीच वर्षे आम्ही सर्वसामान्यांसाठी राबणार. राज्यात शिवसैनिकाला काय मिळालं? माझ्याकडे तालकुाप्रमुख, जिल्हाप्रमुख येऊन रडायचे. आम्हाला मेळाव्याला बोलवायचे. आमची परिस्थिती काय आहे? याकडे कोणी लक्ष देत नाही, असं मला सांगायचे. मग मी नगरविकास विभागाकडून निधी देण्याचा प्रयत्न केला. पण मी एकटा काय करणार? अडीच वर्षात शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्यात आले,” असा आरोपही शिंदे यांनी केला.

हेही वाचा >>> “जेव्हा स्वतःला आरशात पाहताना…” संजय राऊतांच खोचक ट्वीट

“मी पहिल्या दिवसापासून हिंदुत्वाची भूमिका घेतली; ती लोकांनी मान्य केली. सर्वांगीन विकासाचं हे हिंदुत्व असेल असा विश्वास ठेवा. माझ्यातला कार्यकर्ता मी कधी मरु देणार नाही. मी मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक म्हणूनच मी काम करेन. तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मंत्रालयातील मुख्यमंत्री दालन खुले असेल,” असे आश्वासन शिंदे यांनी जनतेला दिले.