Eknath Shinde On Waqf Amendment Bill: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजेजू यांनी वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले आहे. दरम्यान सध्या लोकसभा सभागृहात या विधेयकावर चर्चा सुरू असून, सत्ताधारी याचे समर्थन करत आहेत. तर, विरोधक याला विरोध करत आहेत. याचबरोबर या वक्फ दुरूस्ती विधेयकावरून सभागृहाबाहेरही प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्फ विधेयकावरील भूमिकेवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे.

मुस्लिम समाजाने विचार करावा

वक्फ दुरूस्ती विधेयकावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या फायद्याचे आहे. त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे.” पुढे पत्रकारांनी या विधेकावरील ठाकरे गटाच्या भूमिकेचा उल्लेख करतात एकनाथ शिंदे म्हणाले, “हे बघा, असली पळपूटी भूमिका कशाला घ्यायची. स्पष्ट भूमिका घ्या ना. तुम्ही गोष्टी जेव्हा फायद्याच्या असतात तेव्हा धरता आणि तोट्याच्या असतील तेव्हा सोडता.”

बाळासाहेबांचे विचार की राहुल गांधी?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत ते १०० जागा लढले आणि २० जिंकले. इथून पुढे होणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता बघायचे आहे की, ते बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका घेऊन पुढे जातात की, राहुल गांधी सांगतील तसे करणार.”

संसदेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यासह, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत आणि इतर वरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

संसदेत भाजपावर टीका करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, “मला विचारायचे आहे की हे विधेयक अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने बनवले आहे की इतर कोणत्या विभागाने? हे विधेयक कुठून आले? आज देशातील अल्पसंख्याकांची अवस्था अशी झाली आहे की, सरकारला त्यांना त्यांच्या धर्माचे प्रमाणपत्र द्यावे लागते. तुम्ही पाच वर्षे पूर्ण केली आहेत की नाही याचे प्रमाणपत्र इतर धर्मियांकडून मागतील का? या विधेयकात असे का विचारले जात आहे? धर्माच्या या प्रकरणात सरकार का हस्तक्षेप करत आहे.”