Eknath Shinde समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत एक विधान केलं आहे. त्यामुळे नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी देशद्रोही असल्याचं म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे म्हणाले अबू आझमी यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. औरंगजेबाचं कौतुक करणं हे महापाप आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

औरंगजेबाच्या काळात आपला जीडीपी २४ टक्के होता

“मी असं मानतो की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला जीडीपी २४ टक्के एवढा होता. तेव्हा भारताला सोने की चिड़िया म्हटलं जायचं. मग मी याला चुकीचं म्हणू का? तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असं मी मानत नाही”, असं अबू आझमी यांनी म्हटलं. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

नुकताच छावा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अनन्वित अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हे अत्याचार औरंगजेबाने केले होते. त्यामुळे औरंगजेबाचा निषेध अनेक चर्चा सत्रांमधून आणि सोशल मीडियातून केला गेला. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता वगैरे म्हणत त्याचं कौतुक केलं. ज्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत आता काय निर्णय घेतला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान अबू आझमी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होते आहे.

Story img Loader