गेल्या महिन्याभरापासून फक्त दोनच मंत्री अर्थात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा गाडा हाकला जात होता. त्यानंतर अखेर सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला असून आज झालेल्या विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यासंदर्भात आता राजकीय आणि सामाजित वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकराच्या मंत्रीमंडळ विस्तारावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
दोन मंत्र्यांच्या शपथविधीवर आक्षेप
अंजली दमानिया यांनी राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतेलेल्या दोन मंत्र्यांवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये त्यांनी संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झालेले आणि त्यामुळेच ठाकरे सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांचा नव्या सरकारमध्ये समावेश झाल्यामुळे त्यावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्र टीईटी घोटाळा प्रकरणात रद्द झाल्यामुळे त्यांच्याही नावावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे.
“दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रीपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रीपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी”, असं दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“एकही स्त्री मंत्रीपदासाठी योग्य नाही?”
दरम्यान, अंजली दमानिया यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये राज्य मंत्रीमंडळामध्ये एकाही महिलेला मंत्रीपद मिळालेलं नसल्याचा आक्षेप घेतला आहे. “एकही स्त्री मंत्रीपदासाठी योग्य नाही?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यावरून टीका करताना लढा सुरूच ठेवणार असल्याचं ट्वीट केलं आहे.
हे ट्वीट देखील अंजली दमानिया यांनी रीट्वीट केलं आहे.
दरम्यान, यासोबतच अंजली दमानिया यांनी आनंद दिघे यांच्या चित्रपटातील दृश्यांचा संदर्भ देत त्यावरून देखील राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
“मुख्यमंत्री शिंदे, आनंद दिघे यांचे शिष्य ना तुम्ही? त्यांचा हयातीत, तुम्ही अशा एका माणसाचे काय केले हे दाखवलंत ते फक्त चित्रपटापुरतं होतं का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.