Eknath Shinde and Devendra Fadnavis on Pakistani nationals : पाकिस्तानी नागरिकांवरून राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये समन्वयाचा आभाव पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर, राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही जण बेपत्ता नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच सर्व पाकिस्तानी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत राज्य सोडून निघन जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी आमचा देश सोडून निघून जावं. पाकिस्तानी नागरिकांनो चालते व्हा असं फर्मान त्यांनी काढलं आहे. हे प्रत्येक भारतीयांच्या मनातलं फर्मान आहे. ही तुमच्या आमच्या मनातली इच्छा आहे. महाराष्ट्रातही काही पाकिस्तानी नागरिक होते. त्यापैकी १०७ पाकिस्तानी नागरिक कुठेतरी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून चालते व्हा. पाकिस्तानी नागरिकांनी आमचा देश सोडून निघून जावं, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. कारण लोकांच्या मनात चीड आणणारी घटना (पहलगामधील दहशतवादी हल्ला) घडली आहे.

एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही : फडणवीस

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा दावा खोडून काढला आहे. फडणवीस यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्ममांशी बातचीत केली. यावेळी काही वार्ताहरांनी फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले, “१०७ नागरिक हरवल्याचं बोललं जात आहे. मात्र, एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही.”

“सर्व पाकिस्तानी नागरिकांची परत पाठवण्याची तयारी झालीय”

मुख्यमंत्री म्हणाले, “जेवढे पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आले होते ते सगळे सापडले आहेत आणि सगळे आता देशाबाहेर चालले आहेत. या सर्वांची स्वगृही परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक आपल्या राज्यात राहणार नाही. माझा अंदाज आहे की आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर एकही पाकिस्तानी आपल्याला दिसणार नाही.”