Sanjay Raut on Eknath Shinde : काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवायची होती म्हणून उठाव केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, असं विधान करून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना बंडाच्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या टीकेवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत चोख प्रत्युत्तर दिलंय. ते आज ज्या नेत्यांकडून सत्कार स्वीकारत आहेत, त्यांनीच एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केला होता, असा दावा संजय राऊतांनी केलाय. ते आज माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

“खरा वाघ कोण असेल तर त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्यांचाच चेला हा एकनाथ शिंदे आहे. शब्द दिला तर दहावेळा विचार करतो. शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी हे (शिवसेनेत बंड पुकारलं) केलं. बाळासाहेब म्हणायचे की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. रामदास कदम म्हणाले त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर हा पक्ष फुटला नसता”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संजय राऊतांचा पलटवार काय?

एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “मग तुम्ही ज्यांच्या दावणीला चोरलेला धनुष्यबाण लावला आहे, ते योग्य आहे का? दिल्लीला उठाबशा का काढत आहात? ते बाळासाहेबांना मान्य आहे का? एकनाथ शिंदेंना आत्मचिंतनाची गरज आहे. कामाख्या मंदिरात किंवा कुठेतरी जाऊन त्यांनी आत्मचिंतन करावं. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणीच बांधली नाही. आज ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर बसला आहात, त्यांनी बेईमानी केली.”

एकनाथ शिंदे ज्युनिअर नेते, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही

“महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदे सहभागी होते. त्या सर्व निर्णयात एकनाथ शिंदे होते. त्यांचं लक्ष फक्त त्यांना कोणतं खातं मिळतंय याकडेच होतं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत विचार होऊ शकला नाही. महाविकास आघाडी तयार करून हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदेंची होती”, असंही संजय राऊत म्हणाले.

शरद पवारांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको अशी भूमिका घेतली

“भाजपाबरोबर सत्ता स्थापन करण्यावेळी एकनाथ शिंदेंना विधिमंडळाचे नेतेपदही दिलं होतं. पण तेव्हा सरकार स्थापन होऊ शकलं नाही. पण आज ते ज्यांच्याबरोबर बसले आहेत असे अजित पवार, ज्यांनी त्यांचा दिल्लीत सत्कार केला असे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या वेळी घेतली होती. ते फारच ज्युनिअर आहे, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, अशी भूमिका मांडली होती”, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत

“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं नसत तर विधीमंडळाच्या नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होऊच दिली नसते. जर भाजपाबरोबर सरकार स्थापन झालं असतं, ५०-५० चा शब्द भाजपाने पाळला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे त्याबाबतीत अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांना विधिमंडळाचे नेतेपदी बसवलं हाच त्यांच्यासाठी सिग्नल होता. पण भाजपाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला, त्यांनी महाविकास आघाडीत त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. नंतर ज्या तडजोडी घडतात त्या पुढल्या गोष्टी असतात”, असंही स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं.

Story img Loader