Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने स्पष्ट बहुमत प्राप्त केले असले तरी आता मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि भाजपा अशा दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मुख्यमंत्री पद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी आग्रही आहेत. शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून प्रसारमाध्यमांसमोर तशा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. तसेच काही नेत्यांनी शिवसैनिकांना मुंबईत येण्याचे आवाहन केल्यामुळे असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातून परिस्थिती चिघळू नये, यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले असून कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.
२६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊन शपथविधी होणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपाने निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी भाजपाकडून दबाव सुरू आहे. तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि कार्यकर्तेही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
हे वाचा >> देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे संकेत, दिल्लीत काय घडामोडी?
एकनाथ शिंदे यांनी काय पोस्ट केली?
शिवसैनिक मोठ्या संख्येने वर्षा निवासस्थानी किंवा मुंबईत येऊ नयेत, यासाठी एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेतली आहे. त्यांनी मध्यरात्री एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले.
ते म्हणाले, “महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.”
राज्यात बिहार पॅटर्न राबवा – शिवसेना
शिंदे यांचे निकटवर्तीय खासदार नरेश म्हस्के यांनी ‘बिहार पॅटर्न’चा मुद्दा अधोरिखित केला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या पक्षाला २४३ पैकी ४३ जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने पाठिंबा दिला. राज्यात बिहार पॅटर्न राबविण्यात यावा यासाठी शिंदे पक्षाची व्यहूरचना सुरू आहे. भाजप मित्रपक्षाला संपवते असा प्रचार शिवसेना ठाकरे पक्षाने अडीच वर्षांत केला. हा अपप्रचार आहे हे सिद्ध करण्याची संधी भाजपला चालून आली आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.