मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विश्वादर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेमध्ये भाषण दिलं. मात्र या भाषणाच्या वेळी आपण बंडखोरी का केली, आपला राजकीय प्रवास कसा झाला याबद्दल बोलताना आपल्या दिवंगत मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला. भावनिक झालेले एकनाथ शिंदे काही क्षण थांबले आणि पाणी प्यायल्यानंतर पुन्हा बोलू लागले.
एकनाथ शिंदें हे बंडखोर आमदारांच्या वडिलांचा उल्लेख करुन झालेल्या टीकेवरुन बोलताना, “आमचे बाप कढले गेले,” असं म्हणत संताप व्यक्त केला. “स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही,” असं शिंदे म्हणाले.
“मी विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी निघालो आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांनी सांगितलेलं आठवलं की, अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार मला असं म्हणाला नाही की आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हटलं नाही. हा विश्वास आहे,” असं बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शिंदेंनी म्हटलं. “सुनील प्रभुला माहितीय कशाप्रकारे माझं खच्चीकरण झालं माहितीय. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. पण मागे हटणार नाही,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले. “ही छोटी मोठी घटना नाहीय. जे ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत सदस्यही इकडे तिकडे हलू देत नाही. पण हे एवढं मोठं का झालं, काय घडलं, कशासाठी झालं?,” असा प्रश्न शिंदे यांनी विचारला.
“२०-२५ वर्ष एकनाथ शिंदेंने रक्ताचं पाणी केलंय. मी १७ वर्षांचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणामध्ये मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण सिनियर होते. त्यांना बोललो की यांना करा तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, मला शिकवतो का?,” अशी आठवण शिंदेंनी सांगितली. पुढे बोलताना शिंदेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन निशाणा साधला. “मी कधी घरच्यांचा विचार केला नाही. बापाचा नाव घेतलं, कोणी पोस्टमॉर्टम म्हणाले,” अशी आठवण शिंदेंनी करुन दिली.
पुढे बोलताना शिंदेंनी, बाप काढला. माझे वडील अजून जिवंत आहेत. आई वारली. माझी आई गावी होती. एकदा उद्धवसाहेबांशी बोलणं झालं होतं तेव्हा तिने सांगितलं होतं की माझ्या बाळाची काळजी घ्या. त्यावेळी उद्धव यांनी एवढा मोठा होऊनही ती तुला बाळ म्हणते, असं म्हटल्याचं सांगितलं. तसेच पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी,”मी जेव्हा घरी यायचे तेव्हा आई-वडील झोपलेले असायचे आणि सकाळी उठायचो तेव्हा ते कामावर गेलेले असतायचे. महिन्यात १५-२० दिवस भेटही व्हायची नाही,” असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “एक बाप म्हणून मला श्रीकांतलाही वेळ देता आला नाही,” असं सांगितलं. यापूर्वी आपल्या दोन्ही दिवंगत मुलांबद्दल बोलताना, “माझी दोन्ही मुलं गेली तेव्हा, दिघेसाहेबांनी मला आधार दिला,” असं शिंदे म्हणाले. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला. आवाज जड झाला. ते काही वेळ थांबले आणि त्यानंतर पाणी पिऊन पुन्हा बोलू लागले.
२००० साली शिंदे यांच्या लहान मुलाचा आणि मुलीचा गावी नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ते पूर्णपणे खचून गेले होते. एकनाथ शिंदेंना दिघेंनी आधार देत त्यांना राजकारणात अधिक सक्रीय भूमिका घेण्यासाठी भाग पाडत या खासगी दु:खातून बाहेर काढलं होतं.