एकीकडे विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकासआघाडीची अनेक मतं फुटली आणि भाजपाने त्यांच्या सर्व पाच जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर गेले. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. अशातच एकनाथ शिंदे यांच्या फेसबूक पेजवर योगदिनानिमित्त एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात त्यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, “योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग.” या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी जागतिक योग दिन हा हॅशटॅग वापरला आहे.
विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. ते म्हणाले होते, “महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सचिन आहिर व आमश्या पाडवी यांची विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.”
एकनाथ शिंदेंसोबत रायगडचे तिन्ही शिवसेना आमदार संपर्क क्षेत्राबाहेर
महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे संपर्काबाहेर आहेत. शिवसेनेकडून वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांचा फोन लागत नाही आहे.
आमदारांची राष्ट्रवादीविरोधातील नाराजी
या तिन्ही आमदारांनी वारंवार राष्ट्रवादीविरोधातील आपली नाराजी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री असल्याने त्यांनी विरोध करत तिथे पक्षाचा पालकमंत्री द्यावा अशी मागणी अनेकदा केली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं. हीच नाराजी एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी कारणीभूत ठरली असावी असं बोललं जात आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावरील नाराजीमुळे शिवसेनेच्या तीन आमदारांनी अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमिपुजन समारंभाला गैरहजेरीदेखील लावली होती.
शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमत्री आदिती तटकरे यांना हटवा, अशी माणगी केली होती. ‘कोणीही द्या, पण रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या’ अशी मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागणीची अद्याप फारशी दखल घेतलेली नव्हती.