शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे ‘दसरा मेळावा’ साजरा केला जात आहे. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अटीतटीचे प्रयत्न केले होते. अखेर मुंबई महापालिकेनं ठाकरे गटाला शिवतीर्थ मैदानात सभा घेण्याची परवानगी दिली. यंदाही दोन्ही गटाने शिवतीर्थ मैदान मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली. पण यंदाही शिवतीर्थ मैदान ठाकरे गटालाच मिळालं. यानंतर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.
२४ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवलं आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा ऑडिओही जोडला आहे. तसेच बेधडक घणाघाती शब्द मांडणाऱ्या, व्यंगचित्रातून बुरखा फाडणाऱ्या, हिंदवी अभिमान बाळगणाऱ्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा… असा उल्लेख टीझरमध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा- “देवेंद्र फडणवीस भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात टीझरमध्ये म्हटलं, “गां** औलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल. या मर्दाची टक्कर घेण्याची हिंमत कुणीही करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्तानात उभं राहिलं पाहिजे. ते चित्र मी हिंदुंच्या आणि हिंदुत्वाच्या रुपाने उभा करतोय.” याव्यतिरिक्त “ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. तुम्हा तमाम शिवसैनिकांची ही शिवसेना आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आवाजात म्हटलं आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर २४ ऑक्टोबर रोजी शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणाला लक्ष्य करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.