पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला एकप्रकारे गळती लागली आहे. ठाकरे गटातील अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. आता ठाकरे गट समाजवादी पार्टीबरोबर युती करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आज या नवीन युतीची घोषणाही होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी कुणाबरोबर युती करावी, हा त्यांचा प्रश्न आहे. संबंधित युतीबाबत आम्ही बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली. उद्धव ठाकरेंनी स्वत:चे सहकारी सांभाळले असते तर त्यांना इतर पक्षांबरोबर जाण्याची गरज नव्हती, असा टोलाही केसरकरांनी लगावला.
हेही वाचा- “उदयनराजेंनी आधी निवृत्त व्हावं”, ‘त्या’ विधानावर एकनाथ खडसेंची खोचक प्रतिक्रिया
ठाकरे गट आणि समाजवादी पार्टीच्या संभाव्य युतीबाबत विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले, “कुणी कुणाबरोबर जावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यावर आम्ही बोलणं योग्य नाही. त्यांनी (उद्धव ठाकरे) स्वत:चे सहकारी सांभाळले असते तर त्यांना इतर पक्षांबरोबर जाण्याची काही आवश्यकता नव्हती. एकत्र युती महाराष्ट्रावर अनेक वर्षे राज्य करू शकली असती. अशा तऱ्हेने जेव्हा राजकीय तडजोडी केल्या जातात. त्यावेळी सत्ता फार काळ टिकत नाही. असं सरकार जनतेची सेवाही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती महाराष्ट्रानं बघितली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार पाहिजे आणि असं स्थिर सरकार केवळ युतीच (शिंदे गट आणि भाजपा) देऊ शकते.”