भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून चालू आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा पडल्यानंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले तर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार, असं विधान जानकर यांनी दिलं.
महादेव जानकर यांच्या विधानाबाबत विचारलं असता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे, हे खरं आहे, अशा आशयाचं विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे. बुलढाणा येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना आमदार गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा- “…तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल”, महादेव जानकर यांची घोषणा
यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले, “हे खरं आहे की, पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे. ज्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि समाजासाठी खूप काही केलं, पण असं कुठेतरी वाटतंय की मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आहे.”
हेही वाचा- “जवळच्या माणसानेच पंकजा मुंडेंचा घात केला”; बच्चू कडूंचं थेट वक्तव्य, म्हणाले…
महादेव जानकर नेमकं काय म्हणाले होते?
अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले की, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानले होते. पंकजा मुंडे या माझ्या बहीण आहेत. माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले, तर मी नक्कीच पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेल.आम्हाला भाजपामध्ये पक्ष विलीन करा, असे सांगण्यात आले होते. पण आम्ही पक्ष विलीन केला नाही. आम्ही होतो म्हणून भाजपाचे सरकार आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाला कोणी ओळखत नाही. भाजपा हा छोट्या छोट्या पक्ष्याला टेकू बनवत आणि मोठा होऊ पाहत आहे, असंही जानकर म्हणाले.