मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून रस्सीखेच सुरू झाला आहे. दोन्ही गटाने मेळाव्याच्या परवानगीसाठी महापालिकेत अर्ज केला आहे. शिवतीर्थावर आम्हीच मेळावा घेणार, यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ठाम आहेत. आमच्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आमचा मेळावा शिवतीर्थावरच होणार. तुम्ही सैन्य जरी बोलावलं तरी आमचा मेळावा शिवतीर्थावर होणार, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. राऊतांच्या या विधानाला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं.
संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता संजय गायकवाड म्हणाले, “शिवतीर्थावर मेळावा घेण्यास बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवात केली. तिथे बाळासाहेबांनी कडवट हिंदुत्वाचे विचार मांडले. आमचीही तीच धारणा आहे. बाळासाहेबांच्या विचाराने आणि पदस्पर्शाने पावन झालेलं ते शिवतीर्थ आहे. त्या शिवतीर्थावरून केवळ शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार मांडले गेले पाहिजेत.
“पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली असून आज ते काँग्रेसबरोबर युतीच्या गोष्टी करतायत. त्यामुळे ते शिवतीर्थावरून कधीच बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाहीत, म्हणून आमच्या पक्षाचा आग्रह आहे की, ती जागा आम्हालाच भेटली पाहिजे. कारण बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत,” असं संजय गायकवाड म्हणाले.
हेही वाचा- “अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
खासदार संजय राऊतांवर टीकास्र सोडताना संजय गायकवाड म्हणाले, “राहिला प्रश्न संजय राऊतांचा तर संजय राऊतांसारख्या खटमलाला (ढेकूण) मारण्यासाठी सैन्याची गरज नाही. ते पोलिसांच्या गराड्यातून दहा मिनिटंही बाहेर आले तर आमचा एक सैनिकही त्यांना पुरून उरेल.”