गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी फूट पडली. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट सरकारमध्ये सामील झाला. ९ आमदारांनी पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, अद्याप त्यांना खाती देण्यात आलेली नाहीत. तसेच, सरकारचा मंत्रीमंडळ विस्तारही अद्याप प्रलंबित आहे. त्यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सूचक विधान केलंय.
“खात्यांबाबत कुणाचीही काहीही मागणी नाही”
एकीकडे अजित पवार गटानं अर्थखात्याची मागणी केली असून दुसरीकडे शिंदे गटाकडून त्याला विरोध होत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, अशी कोणतीही मागणी कुणीही केलेली नसल्याचा दावा संजय शिरसाट यांनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे. “मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या होऊ शकतो. तो अधिवेशनानंतर होण्याचा प्रकार घडणार नाही अशी माझी माहिती आहे. पण शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यायचा आहे. खात्यांबद्दलची कोणतीही चर्चा नाही. खात्यांबाबत ठाम भूमिका घेणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. जसा तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे, तसा देवेंद्र फडणवीस वा अजित पवारांचाही आहे. या तिन्ही नेत्यांच्या दोन वेळा झालेल्या बैठकांमध्ये सगळं ठरलेलं आहे. खात्यांबाबत कुणीही काहीही मागणी केलेली नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
“ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच खाती मिळणार”
दरम्यान, चर्चा किंवा दावे काहीही असले, तरी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच प्रत्येकाला खाती मिळणार, असं शिरसाट म्हणाले आहेत. “जो फॉर्म्युला ठरला, त्याप्रमाणेच खाती मिळणार आहेत. तो फॉर्म्युला त्या तिघांना (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) माहिती आहे. आपण करत असलेली चर्चा वायफळ आहे. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत का? किंवा आमदारांचा गट नाराज आहे का? असं काहीही घडलेलं नाही”, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
“अजित पवार सरकारमध्ये आले त्याचे बॅकबोन अमित शाह”
“अजित पवारांचा काल दिल्लीत जाण्याचा उद्देश वेगळा होता. राष्ट्रवादी आमच्याबरोबर आली त्याचे बॅकबोन अमित शाह आहेत. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेणं हे काम असतं. म्हणून अजित पवार व प्रफुल्ल पटेल त्यांना भेटले. तिथे अनेक राजकीय चर्चा होतात. पण त्या सर्व बाहेर आल्याच पाहिजेत असं काहीही नाहीये. सर्व चर्चा झालेली आहे आणि सर्व व्यवस्थित घडत आहे. माझ्या माहितीप्रमाणे उद्या मंत्रीमंडळ विस्तार होईल. कारण पुढे शनिवार-रविवार आहे, सोमवारपासून अधिवेशन आहे”, असा दावाही शिरसाट यांनी यावेळी केला.
ठाकरे गटाला धक्का, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा, ‘हे’ दोन आमदार इच्छुक
“फॉर्म्युला असा असतो की जेव्हा तिसरा पक्ष युतीमध्ये येतो, तेव्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवायचं असतं की आपल्याकडची कोणती खाती त्यांना द्यायची. कमी-अधिक करावंच लागेल. की त्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवायचं? त्यामुळे त्यांना कोणती खाती द्यायची याचं व्यवस्थित नियोजन झालं आहे. या चर्चा फक्त बाहेर चालू असतात. उद्या मंत्रीमंडळ विस्तार होणारच”, असंही ते म्हणाले.