राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत. अजित पवार निधी देत नव्हते, म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून करण्यात आला होता. आता अजित पवारच सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे.
शिवाय अजित पवार गट मंत्रिमंडळात सामील झाल्याने त्यांच्या गटालाही काही मंत्रीपदं द्यावी लागली आहेत. त्यामुळे आधीपासून मंत्रीपदाची आशा लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांची निराशा झाली आहे. यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सहन करण्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचं नसतं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- काँग्रेसचे आमदारही भाजपाच्या संपर्कात? नाना पटोले म्हणाले, “दुसऱ्यांची घरं फोडणं…”
मंत्रीमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीबद्दल विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “माझं मत असं आहे की, मी मंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला नव्हता. पण एकंदरीत जी राजकीय व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेत कोण कसं अडचणीत येतं, हे मी सांगितलं.”
हेही वाचा- मोठी अपडेट: महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान
शिंदे गटातील ८ ते १० आमदार नाराज असून त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत संपर्कात करत आहेत. ते आमदार पुन्हा ठाकरे गटात जातील का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे. वाट पाहण्याची आणि सहन करण्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचं नसतं, असं विधान बच्चू कडू यांनी केलं. आमदार कडू म्हणाले, “शेवटी वाट पाहण्याची एक मर्यादा असते. किती वेळ थांबायचं आणि किती सहन करायचं याचीही एक मर्यादा असते. या मर्यादा तुटल्या तर कुणी कुणाचं नसतं.”