गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार महायुतीत सामील झाले आहेत. या सत्ताबदलानंतर आता महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतापराव जाधव यांच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे काँग्रेसचा मोठा गट लवकरच महायुतीत सामील होईल, असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “…हा माणूस प्रत्यक्षात अत्यंत कृतघ्न निघाला”, वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले की, “वरिष्ठ लोकांना डावलून विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या कनिष्ठ (ज्युनिअर) माणसाला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने काँग्रेसमधील सगळे वरिष्ठ नेते अतिशय अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावं घ्यायची गरज नाही. संबंधित नेत्यांची नावं आपल्या सर्वांना माहीत आहेत. ते सर्वजण अतिशय अस्वस्थ झाले आहेत. ते योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात महायुतीत सहभागी होईल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde faction prataprao jadhav statement congress senior leaders will join mahayuti vijay wadettiwar rmm
Show comments