ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीत ‘निर्धार सभा’ घेतली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजपासह शिंदे गटाचे स्थानिक आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. यावेळी ठाकरेंनी संतोष बांगर यांना सापाची उपमा दिली. गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी (२८ ऑगस्ट) संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढत शक्तीप्रदर्शन केलं आहे. बांगर यांच्या कावड यात्रेच्या कार्यक्रमाला कालीचरण महाराजही उपस्थित होती. ही कावड यात्रेत संतोष बांगर यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी मुख्यमंत्री झालो तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असं वक्तव्य केलं आहे. बांगर यांचं वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी येड्यांची जत्रा…”, हिंगोलीतील सभेवरून संतोष बांगर यांचा हल्लाबोल
कावड यात्रेत भाषण करताना संतोष बांगर म्हणाले की, बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आमची सत्ता आली तर सगळ्यांना भगव्या टोप्या देऊ. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो तर सगळ्या पोलिसांना भगव्या टोप्या देईन.”
दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीतील सभेवर भाष्य करताना संतोष बांगर म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांनी येड्यांची जत्रा उभी केली. येडे काहीही करू शकत नाहीत. थोडं त्यांच्यावर अंगावर धावून गेलं, तर ते भुर्र पळून जाणारी लोक आहेत. याचा आमच्या शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही.