शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन बडतर्फ केलं आहे. एकनाथ शिंदेंनी कथित बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय आहे. अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली आहे. याबाबत अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित होत आहेत.

एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे गटनेत्याला बडतर्फ केलं जाऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी केला आहे.

संबंधित व्हिडीओत त्यांनी म्हटलं की, “मला जो काही नियम माहीत आहे, त्यानुसार गटनेत्याच्या अशाप्रकारे हकालपट्टी करता येत नाही. गटनेत्याची हकालपट्टी करायची असेल, तर तुमच्याकडे आमदारांचं बहुमत असावं लागतं. आमदारांची संख्या लागते. जिथे आमदारांची संख्याच नाही, तिथे गटनेत्याची हकालपट्टी करायची, हे कायद्यात बसत नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “उद्या एखाद्या पदाधिकाऱ्यानं उठायचं आणि मी पक्ष प्रमुखांची हकालपट्टी केली, असं सांगायचं, हे योग्य नाही. अशी कायद्यामध्ये मान्यता नाहीये. कायद्यानुसार तुम्हाला बहुसंख्य लोकांची मान्यता घेऊनच गटनेत्याची हकालपट्टी करता येते,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा- “वादळ आलंय पण…”, एकनाथ शिंदे प्रकरणावर छगन भुजबळांचं मोठं विधान, म्हणाले…

खरंतर, राजकीय पक्षाचा गटनेता हा विधानसभेत पक्षाच्या प्रतिनिधिंकडून कोणते विषय मांडायचे, कोणाला बोलण्याची संधी द्यायची, पक्षाची भूमिका काय आहे, हे निश्चित करण्याची जबाबदारी पार पाडतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे २०१९ पासून हे पद होतं. गटनेता हा विधानसभेमधील आमदारांचा कामकाजादरम्यानचा मुख्य दुवा आणि नेता असतो. मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी गटनेता पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय घेतलाय. आता एकनाथ शिदेंऐवजी ही जबाबदारी शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Story img Loader