Uddhav Thackeray And VBA Alliance : उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची आज घोषणा करण्यात आली आहे. या युतीबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आमच्यात युती झालेली आहे. मात्र घोषणा कधी करायची हे उद्धव ठाकरे ठरवतील असे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सातत्याने सांगत होते. त्यानंतर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. दरम्यान, राज्यातील याच नव्या शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयोगावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> ठाकरे गट-वंचितच्या युतीची घोषणा, पण ‘फॉर्म्यूला’ काय? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पुढची राजकीय वाटचाल…”
आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत- एकनाथ शिंदे</strong>

प्रकाश आंबेडकर तसेच उद्धव ठाकरे यांच्यातील युतीला आमच्या शुभेच्छा आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. या युतीची घोषणा होण्याआधी वंचित आणि ठाकरे गट यांच्यात बोलणी सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. प्रकाश आंबेडकर तसेच एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, असे विचारले जात होते. चर्चेला तोंड फुटल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी ही भेट राजकीय नव्हती, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट-वंचितच्या युतीला सुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा >> ठाकरे गट-वंचित युती लवकरच तुटणार? उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले “मला मनापासून…”

ठाकरे- वंचितच्या युतीची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल?

युतीची घोषणा करताना उद्धव ठारे यांनी आगामी राजकीय वाटचालीबद्दल भाष्य केले आहे. “वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्र येण्याचे ठरवले आहे. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल. आज जे काही देशात चालू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. निवडणुका आल्यानंतर गरिबांचा उदोउदो करायचा. गरिबांनी मतदान केल्यानंतर ते रस्त्यावर येतात. तर दुसरीकडे यांची उड्डाणं चालू होतात. हे सगळं थांबवण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

…म्हणून आम्ही दोघे एकत्र येत आहोत

दरम्यान, युतीची घोषणा करताना “जनतेला नको त्या वादात अडकवून भ्रमात ठेऊनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच ठाकरे यांनी भाजपा, शिंदे गट तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde first comment on uddhav thackeray group and vba alliance prd