मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला. याबाबत एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. यावर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “ही जबरदस्तीने पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही. ही सर्व प्रेमाने आलेली माणसं आहेत,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) पैठणमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर आजच्या विराट सभेने दिलं आहे. संदीपान भुमरे बोलले आहेत की, ही जबरदस्तीने पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही. ही सर्व प्रेमाने आलेली माणसं आहेत. माता-भगिनी सकाळी ११ वाजल्यापासून मोठ्या संख्येने सभेसाठी बसल्या आहेत. मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. पुरुष बांधवांनाही धन्यवाद दिलं पाहिजे, ते बहुसंख्य आहेत. मी सर्वांनाच धन्यवाद देतो.”
“मी राजकारणात दिलेला शब्द पाळतो”
“ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. ही संदीपान भुमरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आहे. रावसाहेब दानवे म्हटले त्याप्रमाणे आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा घेतलाय त्याला पसंती देणारी ही गर्दी आहे. म्हणून मी आपलं मनापासून स्वागत करतो. भुमरेंनी सांगितलं की, मी राजकारणात दिलेला शब्द पाळतो म्हणून एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
हेही वाचा : “सत्ताधारी पक्षाचे आमदार रिवॉल्व्हर काढून गोळीबार करायला लागले तर…”, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया
“एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही”
“मला बाळासाहेबांनी, आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली, ती म्हणजे जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.