सातारा : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, ते पत्रकारांवरच चिडले. ‘अरे काही तरी कामाच्या गोष्टी करा रे, ते जाऊ द्या’ असा त्रागा व्यक्त करत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ‘हा विषय त्या दोघांचा आहे. ते दोघे भाऊ आहेत. त्यांना काय वाटते त्याप्रमाणे ते निर्णय घेऊ शकतात. त्या विषयी आम्ही मत व्यक्त करू शकत नाही,’ असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले.

साताऱ्यात आज दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी मुक्कामी आले आहेत, तर अजित पवार पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आहेत. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. या विषयी दरे (ता. महाबळेश्वर) येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, पत्रकारांवरच चिडले. ‘अरे काही तरी कामाच्या गोष्टी करा. ते जाऊ द्या! ’ असे म्हणत रागावले. त्यामुळे या वेळी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केले.

दरम्यान, साताऱ्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेना-मनसेच्या एकत्र येण्याबाबत विचारले असता, तो त्या दोघांचा निर्णय आहे. ते दोघे भाऊ आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यावा, हे पूर्णतः त्यांच्यावर अवलंबून आहे, असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.