एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात अभूतपूर्व सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. महाराष्ट्र-सुरत-गुवाहाटी नंतर गोवा असा प्रवास करत हे बंखोडर आमदार परत महाराष्ट्रात आले होते. मात्र यामध्ये नितीन देशमुख हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत, जे गुवाहाटी येथून उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले होते. याच नितीन देशमुखांनी आता राज्यातील सत्तांतरावर मोठे विधान केले आहे. राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असे नितीन देशमुख म्हणाले आहेत. ते रविवारी (१८ सप्टेंबर) अकोला जिल्ह्यात एका सभेला संबोधित करत होते. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>> “पहिल्या यादीत माझे नाव होते, पण ऐनवेळी…” मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मागील दीड वर्षांपासून षडयंत्र सुरू होते. हे षडयंत्र आताचे नव्हते. त्यांनी माझ्यावर पुन्हा चुकीची कारवाई केली, तर मी माझ्याकडील क्लीप बाहेर काढणार. त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवले. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत, असे नितीन देशमुख म्हणाले.
हेही वाचा >>> माझे नाव ‘देवेंद्र शेट्टी फडणवीस’ ; विश्व बंट संमेलनात उपमुख्यमंत्र्यांची टिप्पणी
उद्धव ठाकरे भेटत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्हाला वाचवायची होती. बाळासाहेबांचे विचार आम्हाला वाचवायचे होते, असे काही नेते सांगतात. मात्र त्यांच्या आवाजाची क्लिप जर मी बाहेर काढली तर खरं काय ते समोर येईल. राज्यात पैसे घेऊन सत्तांतर झालं, हे जर सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असेही नितीन देशमुख म्हणाले.