मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा कळीचा ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना १२ आमदारांची यादी देण्यात आली होती. ही यादी देऊन जवळपास पावणे दोन वर्षे उलटली, तरीही राज्यपालांकडून या यादीला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा वाद निर्माण झाला होता.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळलं. पण अद्याप संबंधित १२ आमदारांच्या यादीला मंजुरी देण्यात आली नाही. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी राज्यपालांना स्मरणपत्र पाठवून संबंधित यादीला मंजुरी देण्याची आठवण करून दिली होती. पण महाविकास आघाडी सरकारने सुचवलेली नावं ही त्या-त्या क्षेत्रातील नसल्याचा आक्षेप राज्यपालांनी घेतला होता. हे कारण देत राज्यपालांनी संबंधित यादी प्रलंबित ठेवली होती.
पाहा व्हिडीओ –
यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार संबंधित १२ जागांसाठी नवीन यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. ही यादीत कोणाची वर्णी लागणार आणि राज्यपाल किती दिवसात संबंधित यादीला मंजुरी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.