शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. १६४ विरुद्ध ९९ मतांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. विशेष म्हणजे विश्वासदर्शक ठरावामध्ये विरोधकांची संख्या तिहेरी आकड्यापर्यंतही पोहचू शकली नाही. याच मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावाचं भाषण करताना काँग्रेसच्या काही आमदारांनी अप्रत्यक्षपणे या अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याचा इशारा करत या ‘बाहेरुन मदत केलेल्यांचे’ आभार मानले.
नक्की पाहा >> Photos: कट्टर शिवसैनिक ते ४० दिवसांचा तुरुंगवास; फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक करताना विधानसभेत मांडलेले १० मुद्दे
बाहेरुन समर्थनाचा उल्लेख
शिंदे यांच्या विजयानंतर सभागृहामध्ये बोलाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख करताना ‘शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री’ असा केलाय. यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी, ‘शिवसेना भाजपा युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजीनंतर फडणवीसांनी पुन्हा आपलं भाषण सुरु केलं. “एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला म्हणून शिंदेंचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्यांचे अभार तर मानतोच पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मतांनीनी पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्यांचेही आभार मानतो,” असं फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी बाकं वाजवून या वक्तव्यावर आनंद व्यक्त केला.
नक्की वाचा >> “स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला लाभलेल्या राज्यपालांपैकी हा एक नंबरचा बोगस राज्यपाल”; कोश्यारींना अपक्ष आमदाराने केलं लक्ष्य
फडणवीसांचा इशारा कोणाकडे?
झालं असं की आज अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख हे नेते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस सभागृहामध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही. या आमदारांबरोबरच प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर काल ही अनुपस्थित होते आज ही अनुपस्थित होते. याच सर्वांना उद्देशून फडणवीसांनी ‘बाहेर राहून मदत केली’ असं म्हटलं.
नक्की वाचा >> मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, ‘या’ दोन कारणांमुळे शिंदे सरकार केव्हाही पडू शकते; शरद पवारांनी दिला इशारा
का आले नाहीत हे आमदार?
सभागृह ११ वाजता सुरु झालं. पण काँग्रेसचे चार सदस्य उशिरा आले. सभागृहामध्ये प्रवेश देण्याची वेळ संपल्याने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख यांना विश्वासदर्शक ठरावासाठी सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. तर जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने ते अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे या परदेशी असल्याने त्या सभागृहात आल्या नाहीत. हे सहा महत्वाचे आमदार अनुपस्थित असल्याने विरोधकांची विश्वासदर्शक ठरावाची आकडेवारी ९९ पर्यंतच पोहोचली.