वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कृषीमंत्री असणाऱ्या सत्तार यांनी उद्धव ठाकरे घरात बसून राहिल्याने सत्ता गेल्याचं विधान जाहीर भाषणामध्ये केलं आहे. इतकच नाही तर पुढील दहा जन्म तुमची सत्ता येणार नाही असं भाकितही सत्तार यांनी केलं असून शिवसेनेनंही या टीकेला तशाच शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.
नक्की वाचा >> मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची…”
सत्तार यांनी जाहीर भाषणामध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर टीकास्र सोडलं. घरात बसून राहिल्याने सत्ता गेली. मुख्यमंत्री हे छोटं पद नाही याचा आता अंदाज लावता येतोय, असं म्हणत सत्तार यांनी उद्धव यांना लक्ष्य केलं. “हे कशामुळं झालं? घरात बसल्यामुळे. आज तुम्ही शाखेमध्ये चालले, मैदानात बोलवण्याची तयारी, लोकांना आसमान दाखवू म्हणाले. मग अडीच वर्ष काय केलं? मुख्यमंत्री म्हणजे छोटं पद नाही. ते किती शक्तीशाली असतं याचा अंदाज आज माझ्यासारखा कार्यकर्ता लावू शकतो. ज्यावेळेस होता त्यावेळेस काही दिलं नाही. आता काय देणार?” असं सत्तार यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं.
नक्की वाचा >> “देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान
इतक्यावरच न थांबता सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना तुमची सत्ता आता दहा जन्म येणार नाही असंही म्हटलं. “तुमची सत्ता येण्याचं स्वप्न पुढच्या दहा जन्मांमध्ये पण पूर्ण होणार नाही हे मी सांगतो” असं विधान अब्दुल सत्तार यांनी जाहीर भाषणात केलं. शिवसेनेनंही या टीकेला उत्तर दिलं आहे.
नक्की पाहा >> ‘हिंदू मराठ्यांच्या मुठी आवळल्या तर…’, ‘सणासुदीच्या काळात…’; ‘पाकिस्तान जिंदाबाद’वरुन राज ठाकरेंचा संताप
शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि नेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांसोबत भाष्य करताना सत्तार यांच्या दहा जन्म शिवसेनेची सत्ता येणार नाही या टीकेवर प्रतिक्रिया दिली. “ही सगळी भाकितं म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते असा प्रकार आहे. त्यामुळे त्यांनी उगाच काव काव करु नये,” असं गोऱ्हे म्हणाल्या.