गेल्या दोन दिवसांपासून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी यासाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे सरकारवर टीका केली आहे. “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावरून आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीव्ही ९ शी बोलताना आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

टाटा एअरबस निर्मिती प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. “टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण, पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

अब्दुल सत्तारांचं खोचक प्रत्युत्तर!

दरम्यान, यावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं आहे. “खरंतर मला आश्चर्य वाटतंय आदित्य ठाकरेंचं. तो प्रकल्प कधी गेला? कसा गेला? कोणती तारीख होती? हे जर बारकाईनं त्यांनी पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. २१ सप्टेंबर २०२१ ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा कोण मुख्यमंत्री होते? त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. जे बोलत आहेत, ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते”, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

‘टाटा एयरबस’ प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर प्रहार; म्हणाले “खोके…”

“या व्यवहारात त्यांच्याशी देवाण-घेवाण बरोबर झाली नाही का? यावरही लोक प्रश्न विचारू लागले आहेत. छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते जर आधी बोलले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती”, अशा शब्दांत सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde group abdul sattar mocks aaditya thackeray shivsena as chhota pappu pmw
Show comments