सध्या दिवाळीचा उत्साह सगळीकडे दिसत असला, तरी राजकीय मंडळींकडूनही आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी सुरूच आहे. १०० रुपयांत दिवाळीचा शिधा देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली असताना हा शिधा अनेकांपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात बारामतीमध्ये बोलताना सरकारवर टीका केली. तसेच, हा शिधा काळाबाजार करून २००-३०० रुपयांना विकला जात असल्याचाही दावा त्यांनी केल्यानंतर शिंदे गटाचे बंडखोर आमदार किशोर पाटील यांनी यावरून अजित पवारांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांनी बारामतीमध्ये बोलताना शिधा काळाबाजार करून विकला जात असल्याचा आरोप केला. “योजना राबवत असताना त्याचं व्यवस्थित नियोजन करावंच लागतं. नियोजनशून्य कारभार केला, की अशा समस्या निर्माण होतात. काही गोष्टी आहेत, काही नाहीत. दिवाळी झाल्यानंतर सवलतीच्या दरातला शिधा मिळाला तर त्याचा काय उपयोग आहे? त्यांचे मंत्री सांगतायत की पोहोचलाय. पण अजिबात पोहोचलेला नाही. काहींनी सांगितलं की त्याचा काळा बाजार सुरू आहे. १०० रुपयांमधला शिधा कुणी २०० किंवा ३०० रुपयांना विकत आहे. हे चुकीचं आहे. त्यात बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“या तर चोराच्या उलट्या बोंबा”
दरम्यान, अजित पवारांच्या विधानावर बोलताना पाचोऱ्यातील बंडखोर आमदार किशोर पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे. “असं वाटतं की या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आपण स्वत: काही करायचं नाही. पण राज्यकर्ते जेव्हा काही करतात, तेव्हा त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू करायची. लोक १०० रुपये देऊन हे किट घेऊन जात आहेत”, असं किशोर पाटील म्हणाले.
राज ठाकरे, शिंदे, फडणवीस भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी एकत्र..!”
“..तर मग विरोधकांनी रांगेत उभं राहावं”
यावेळी बोलताना किशोर पाटील यांनी अजित पवारांसह विरोधकांनाच शिधा घेण्यासाठी रांगेत उभं राहण्याचा सल्ला दिला आहे. “टीका करणाऱ्यांना कदाचित हे किट मिळत नाहीये. त्यामुळेच ते कदाचित आरोप करत आहेत. त्यापेक्षा आरोप करणाऱ्यांनी सरळ रांगेत उभं राहावं आणि त्यांनाही एकेक किट देण्याची व्यवस्था आम्ही करू”, असं किशोर पाटील म्हणाले.