राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपामध्येही मंत्रीपदावरून नाराजी असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या दोन्ही गटांकडून सारंकाही आलबेल असल्याचं सांगितलं जात असलं, तरी काही मित्रपक्ष आमदारांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. या नाराजांमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचंही नाव घेतलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाच्या सर्व आमदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिरसाट गैरहजर राहणार असल्याचे संदर्भ लावले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांचा स्नेहभोजन कार्यक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. मात्र, संजय शिरसाट यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सांगितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याआधीदेखील शिवसेना पक्षप्रमुखांचं नाव घेत संजय शिरसाट यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं होतं. त्यानंतर पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये त्यांचा समावेश करण्यात न आल्यामुळे देखील ते नाराज असल्याचं बोललं गेलं. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या निर्णयामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं.

भाजपाचं मिशन बारामती! पवारांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंची मोठी घोषणा; म्हणाले, “कुणाचाही गड…”

दरम्याव, टीव्ही ९ शी बोलताना संजय शिरसाट यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपण नाराज नसल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. “तसं काहीही नाही. हा गैरसमज आहे. मी परवा एकनाथ शिंदेंना भेटलो. मतदारसंघातल्या कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी घेतली जाते. तशी परवानगी मी घेतली आहे. मी कुठेही नाराज नाही. मतदारसंघातल्या कार्यक्रमासाठी मी त्यांची परवानगी घेतली आहे. त्यांनी परवानगी दिली नसती, तर मी नक्कीच त्या कार्यक्रमाला गेलो असतो”, असं शिरसाट यावेळी म्हणाले.

मंत्रीपदाबाबत संजय शिरसाट म्हणतात..

“मंत्रीमंडळ विस्तारावर आम्ही अजिबात चर्चा केली नाही. जेव्हा तो व्हायचा, तेव्हा तो होईल. त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. नाराजी हा भाग माझ्यासाठी आता संपलेला आहे. जो निर्णय एकनाथ शिंदे घेतील, तो मला मान्य असेल”, असं शिरसाट यावेळी म्हणाले.

“इचकंच जर अर्जंट असेल तर…”

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाणं टाळणं अशक्यच असेल, तर मी संध्याकाळच्या विमानाने जाईनही, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. “इतकं जर इमर्जन्सी असेल, तर मी साडेसहाचं विमान पकडून जाईनही. मी गेलो नाही म्हणून काहीतरी मोठं घडतंय अशातला काही भाग नाही. जर असा चुकीचा संदेश जात असेल, तर मी जाईनच. मी त्यांची परवानगी घेतली आहे. त्यामुळे मी तिथे जाणार नाहीये. बाकी काही नाही”, असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde group mla sanjay shirsat unhappy over minister post pmw
First published on: 06-09-2022 at 11:33 IST