एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतून तब्बल ४० आमदार फुटून बाहेर पडले. परिणामी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं. मात्र, यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावरून आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?
न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आमदार अपात्र ठरून हे सरकार कोसळण्याची शक्यता लक्षात घेता शिंदे गटातील १० ते १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं खैरे म्हणाले होते. त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली असताना शहाजीबापू पाटील यांनी त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
खैरैंच्या विधानाचा समाचार घेताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला. ते म्हणतात १० ते १५ आमदार संपर्कात आहेत. म्हणजे नेमका आकडाही अजून नक्की झालेला नाही. काहीतरी ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडण्यापलीकडे यांना उद्योग नाही. यांना काही येत नाही. यांना सगळं कळून चुकलं आहे. आता फक्त शेवटच्या गटांगळ्या मारण्याचं काम चालू आहे”.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना टोला
दरम्यान यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला. “मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलो आहे. ते मला लक्ष्य करणार म्हणजे काय करणार? मी उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. त्यांनी तिथे राहावं. लोकांचं काम करावं आणि माझ्या मतदारसंघावर लक्ष ठेवावं”, असं ते म्हणाले.
शरद पवारांचं पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठं विधान; म्हणाले, “मी आता…!”
“माझ्याइतकी निवडणुकीत पडायची कुणाला प्रॅक्टिस नाही”
“मला लक्ष्य करून फारतर काय होणार? मला पाडणार. पडायची प्रॅक्टिस या महाराष्ट्रात माझ्याशिवाय कुणाला आहे. ७-८ वेळा पडलोय धडाधड. राजकारण आहे म्हटल्यावर हे चालणारच. पडायचं असतं, पुन्हा उठायचं असतं”, असंही ते म्हणाले.