मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मार्च महिना संपण्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता घटनातज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यातील अनेक प्रश्नांना शिंदे गटाच्या वकिलांना उत्तरं देता आली नाहीत.
त्यामुळे हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने लागेल, असा तर्क लावला जात आहेत. दुसरीकडे, निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वास शिंदे गटातील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठं विधान केलं आहे. न्यायपालिकेचा काहीही निर्णय आला तरी त्याचा सन्मान करू. ठाकरे गटासारखं न्यायालय विकलं गेलंय, असं आम्ही म्हणणार नाही, असं विधान प्रतापराव जाधव यांनी केलं.
हेही वाचा- “…तर अधिवेशन संपण्यापूर्वीच हे सरकार अपात्र ठरेल”, अमोल मिटकरींचं मोठं विधान!
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना प्रतापराव जाधव म्हणाले, “ही एक न्यायप्रक्रिया आहे. आमचा न्यायपालिकेवर पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही न्यायालयात अनेक पुरावे आणि कागदपत्रं दिली आहेत. आमचे वकील हरिश साळवे, नीरज कौल यांच्यासह आमच्या सर्व वकील मंडळींनी अतिशय सक्षमपणाने मुद्देसूद आमची बाजू मांडली. त्यामुळे निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा आम्हाला विश्वास आहे. शेवटी न्यायालयात कोणत्याही बाजुने निकाल लागला, तर त्यांच्यासारखं (ठाकरे गट) न्यायालय विकलं गेलंय, असं आम्ही म्हणणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मानच करू.”