मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाने रत्नागिरीमधील दापोली येथे रविवारी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्या बैठकीमध्ये काय घडलं याबद्दलचा खुलासा केला. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना यासंदर्भातील खुलासा केला. त्यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेल्यास बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं म्हणत सभात्याग केल्याचं नमूद केलं.
नक्की वाचा >> “नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला
जाहीर भाषणामध्ये रामदास कदम यांनी महाविकास आघाडीची स्थापना करण्यासंदर्भात ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय घडलं याबद्दल सांगितलं. “मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, ज्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती करण्याचा निर्णय झाला त्यावेळी शिवसेना नेत्यांची बैठक ‘मातोश्री’वर बोलावली होती. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायचा विचार समोर आला त्यावेळी मी उठून उभा राहिलो आणि उद्धवजींना सांगितलं, उद्धवजी शिवसेना प्रमुख माननिय बाळासाहेब ठाकरे आपलं उभं आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करण्यामध्ये घालवलं आहे. ही शिवसेना बाळालासाहेबांनी उभी केली ती राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात संघर्ष करुन उभी केली,” असं रामदास कदम यांनी त्या बैठकीमधील घडामोडींबद्दल भाषणात सांगितलं.
तसेच पुढे बोलताना रामदास कदम यांनी याच बैठकीमध्ये, “आपण त्यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ नका. त्यांच्यासोबत संसार मांडू नका. हे पाप होईल. बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही,” असंही म्हणाल्याचं नमूद केलं. “बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. हे पाऊल उचलू नका हे माझे शब्द होते. त्यांनी नाही ऐकलं. मी उठलो. निघून आलो. तिथपासून आज मितीपर्यंत ‘मातोश्री’ची पायरी चढलो नाही. चढणार पण नाही. कधीच चढणार नाही. मी रामदास कदम आहे,” असंही कदम यांनी भाषणात म्हटलं.
नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख
त्याचप्रमाणे या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे वरुन पाहत असतील आणि आपला मुलगा राष्ट्रवादी तसेच सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला असं म्हणत असतील असं विधानही केलं. “तुम्हाला सांगतो, ही सभा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील. ते म्हणत असतील की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. माझा मुलगा उद्धव सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन तू पुढं चालं माझे आशिर्वाद तुला आहेत, हे बाळासाहेब वरुन सांगत असतील,” असं रामदास कदम म्हणाले.
“जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. संपवून टाकलं सगळं,” असं विधानही रामदास कदम यांनी केलं.