Maharashtra Government Formation Update : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणाच्याही संपर्कात नव्हते. दिल्लीतील बैठक संपल्यानंतर ते थेट दरे या त्यांच्या गावी गेले. तेथून परतल्यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नसून आज त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रु्गणालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना घशाचा संसर्ग झाला असून ताप आणि अशक्तपणा असल्याचं शिवसेनेचे नेते सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेंनी सव्वादोन वर्ष खूप काम केल्याने…
“शिंदेंची प्रकृती बरी नाही. त्यांना घशाचा संसर्ग झाला आहे, कफ झाला आहे. त्यांना थोडा ताप आहे. आम्ही दिल्लीत गेलो होतो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर होतो. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला त्यांना दिलाय. मुख्यमंत्री झाल्यापासून सव्वादोन वर्ष सातत्याने त्यांनी काम केलं आहे. शेवटी ती एक व्यक्ती आहे. इतका ताण शरीरावर दिल्यानंतर प्रकृती खराब होणं साहजिक आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.
हेही वाचा >> Vijay Rupani : मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “एकनाथ शिंदेंना…”
एकनाथ शिंदेंना काल सलाईन लावली होती
“काल जेव्हा आम्ही त्यांना पाहायला गेलो होतो तेव्हा त्यांना सलाईन लावली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रातींचा सल्ला दिला आहे. काल त्यांच्या रक्ताचा नमुना घेतला आहे. त्यात काय निघालंय याबाबत कल्पना नाही. आता त्यांची सर्व तपासणी होतील”, असं संजय शिरसाट म्हणाले. “५ तारखेच्या शपथविधीला जायचं की नाही हे डॉक्टरच ठरवू शकतील. आम्ही सर्व आमदार एकत्रितपणे याबाबत निर्णय घेणार आहोत”, असंही ते म्हणाले.
“एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार नाही. सत्ता त्यांना महत्त्वाची नाही. सत्तेसाठी सोंग ढोंग करणं गरजेचं नाही. परिस्थिती जटील आहे. पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. त्यांनी काय निर्णय घ्यायचा याबाबत संभ्रमता आहे. पक्षाचा निर्णय कोणी घेऊ शकणार नाही. आम्ही सर्वजण जाऊ तेव्हा आम्हाला सर्व परिस्थिती कळेल”, असंही शिरसाट म्हणाले.
एकनाथ शिंदे रुग्णालयातून थेट वर्षा निवासस्थानी
रुग्णालयात नियमित तपासणी केल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईतील शासकीय वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd