Eknath Shinde health Update Givem By Doctors Jupiter Hospital : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते दोन दिवस त्यांच्या गावी जाऊन आले. ते साताऱ्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले होते. तिकडे जाऊन त्यांनी थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर ते रविवारी (१ डिसेंबर) मुंबईत परतले. मुंबईत आल्यावर ते कामाला लागले खरे मात्र त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांनी कालपासून त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम व बैठका रद्द केल्या आहेत. राज्यात एका बाजूला महायुतीसमोर सत्तास्थापनेचा प्रश्न उभा आहे. महायुतीने ५ डिसेंबर रोजी शपथविधीची तयारी सुरू केली आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलेलं नाही. तर एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजपा त्यांना हे पद देण्यास तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. यावर महायुतीला चर्चा करायची आहे. मात्र एकनाथ शिंदे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकांना हजर राहू शकलेले नाहीत. अशातच शिंदे आज पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाले होते.
रुग्णालयात काही तपासण्या केल्यानंतर एकनाथ शिंदे तिथून बाहेर पडले आणि मुंबईतील वर्षा या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर येत होती. सुरुवातीला त्यांनी दरे येथील त्यांच्या गावी विश्राम केला. त्यानंतर गेले दोन दिवस ते ठाण्यात मुक्कामी होते. ज्युपिटर रुग्णालयात नियमित तपासणी करून झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अवघ्या दोन वाक्यांतच त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. शिंदे म्हणाले, “मी तपासण्या करण्यासाठी रुग्णालयात आलो होतो आणि आता माझी प्रकृती उत्तम आहे.” ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये कोणतीही चिंताजनक बाब नसल्याचे नसल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा >> बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अतिधोकादायक यादीत; खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी काय सांगितलं?
दरम्यान, शिंदे रुग्णालयातून निघून गेल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी त्यांच्या डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की “एकनाथ शिंदे आज तपासणीसाठी आले तेव्हा त्यांना थोडा ताप होता. त्यांना घशाचा संसर्ग देखील झाला आहे. प्रामुख्याने त्याच्या तपासणीसाठीच ते आज रुग्णालयात आले होते. त्यामुळे त्यांचा सीटी स्कॅन (Computed Tomography Scan) व एमआरआय करण्यात आलं. त्यांना थोडा अशक्तपणा देखील आहे. परंतु, त्यांचे वैद्यकीय अहवाल बरे आहेत. त्यातील माहिती जाहीर करता येणार नाही. परंतु, अहवाल बरे आहेत इतकं आम्ही सांगू शकतो. फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. ते काम करू शकतात. त्यामुळे ते आताच त्यांच्या कामाला निघून गेले आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांना जाताना पाहिलंच आहे”.