Eknath Shinde On Helicopter Traveling: माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची सातारा जिल्ह्यातील दरे गावची शेती आणि हेलिकॉप्टर प्रवासामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून सतत चर्चेत असतात. अनेकदा विरोधी पक्षांनी विशेष करून शिवसेनेने (उद्धव ठाकरे) त्यांना शेती आणि हेलिकॉप्टर प्रवासावरून लक्ष्य केले आहे. अशात आता एकनाथ शिंदे यांनी शेती करण्यासाठी त्यांचे साताऱ्यातील मूळ गाव दरेला हेलिकॉप्टरमधून का जातात याचे उत्तर दिले आहे.
मी गाडीने गेलो तर…
दरे गावातील शेती आणि हेलिकॉप्टर प्रवासाबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, “मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने गावी जातो. तेव्हा काही लोक म्हणतात मी शेती करायला हेलिकॉप्टरने जातो. मी गाडीने गेलो तर गावी जायला सात-आठ तास लगतील. या सात-आठ तासांत मी दहा हजार सह्या करू शकतो. सह्यांमध्ये माझे रेकॉर्ड आहे.”
गावी आम्ही क्लस्टर शेती करतो
एबीपी माझाच्या, माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलताना, एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “गावी गेल्यानंतर मी गावकऱ्यांच्या भेटी होता. तिथे मी अधिकाऱ्यांनाही बोलावतो. गावी आम्ही क्लस्टर शेती करतो. आम्ही तिकडे ५०० प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. याचबरोबर बांबूची शेतीही करतो. तिथल्या तरुणांना नोकरीसाठी इतर शहरांत यावे लागून नये ही यामागची माझी संकल्पना आहे. त्याला तिथेच नोकरी मिळाली पाहीजे. तिथे कोयनेच्या बॅक वॉटरमध्ये, वॉटर स्पोर्ट्स सुरू केले आहेत. आताचे हिल स्टेशन्स ब्रिटिश काळातील आहेत. आता आपण करत असलेले नवे महाबळेश्वर हे पहिले हिल स्टेशन असेल.”
शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टने फिरू नये का?
२०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी हेलिकॉप्टरने गेले होते. गावी जाऊन त्यांनी शेती केली होती. शेती करतानाचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. यावरून विरोधकांनी, , शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने फिरतो म्हणून टोला लगावला होता. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिप्रश्न करत शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरने फिरू नये का असा प्रतिप्रश्न केला होता.
त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “काही लोकांना वावडं आहे की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे काही लोकांना सहन होत नाही. शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टने फिरू नये का? शेतकऱ्याच्या मुलाने चांगल्या गाडीतून फिरू नये? बंदी आहे का?”, असे प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले होते.