एकनाथ शिंदे हे हवाई सफर जास्तीची आवडत नसलेले आणि रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री आहेत. लवकरच ते पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर येतील असे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.कराडमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्याप्रमाणेच डोंगरी भागातील असून, त्यांचे गाव कोयना धरणाच्या पाणलोट परिसरात येते. त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असल्यानेच त्यांचे पाय जमिनीवर आहेत.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वित्त, गृह आदी खात्याचे राज्यमंत्री म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार आपणाला देण्यात आलेला नव्हता. परिणामी, इच्छा नसतानाही राज्याचे हित नसणारे अनेक निर्णय झाल्याची खंत शंभूराज यांनी व्यक्त केली. मात्र, आता खऱ्या अर्थाने आमचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनहितार्थ काही निर्णय बदलले असल्याने निश्चितच त्याचा चांगला फायदा होईल. असा दावा त्यांनी केला. राज्यात शासकीय व निमशासकीय अशी १ लाख ८२ हजार पदे रिक्त आहेत. हे वर्ष देशाच्या अमृत महोत्सवाचे असल्याने तातडीने ७५ हजार पदे भरली जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांची १५ दिवसांपूर्वी भेट घेऊन राज्याला आर्थिक निधीसाठी चर्चा केली. त्यावेळी उभय नेत्यांनी निधी आयोगाकडून महाराष्ट्राला त्वरेने १९ हजार कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातून अत्यावश्यक कामांना प्राधान्याने निधी देण्याचा राज्य शासन प्रयत्न करेल असे शंभूराज यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क हे आपल्याकडे पदभार असलेले सरकारला मोठे उत्पन्न मिळवून देणारे खाते आहे. तरी, चोरटी दारू रोखण्याबरोबरच कर बुडवेगिरी आणि राज्याच्या सीमा भागातून चोरून येणाऱ्या दारूच्या वाहतुकीला अटकाव करण्यासाठी नियोजनबध्द आराखडा बनवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या खात्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नात वृद्धी करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाहीही शंभूराज यांनी दिली.
कोयना पर्यटन विकासाला लवकरच गती मिळून या प्रदेशाचा वर्षभरात सकारात्मक कायापालट दिसेल. जलसंपदा खात्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी नौका विहारासाठी प्रयत्न करीत असून, नौका विहार सुरु झाल्यास त्यास पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभेल. कोयनानगरच्या नेहरू गार्डनचा विकास व निसर्ग परिचय केंद्रासाठी निधी मंजूर झाला असल्याचे शंभूराज यांनी सांगितले. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण गतिमान विकासाचा आराखडाही बनवण्याचे काम सुरु आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर बोललो असल्याचे मंत्री शंभूराज यांनी या वेळी स्पष्ट केले.