शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मुंबईत मंगळवारी (२४ ऑक्टोबर) दसरा मेळावे पार पडले. दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानात शिंदे गटाचा तर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यांमधून दोन्ही गटांमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि उबाठा गट त्यांच्या स्वार्थासाठी दहशतवादी संघटनांशी युती करेल. उद्धव ठाकरे हमास आणि लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटनांशी युती करतील. एकनाथ शिंदे यांच्या या टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे स्वतः हमास आहेत. मी अशी नावं घेऊ इच्छित नाही. हमास, हिजबुल्लाह, लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांची नावं या भारतात आणि महाराष्ट्रात घेतली जाऊ नयेत, असं मला वाटतं. या संघटनांचं काही महत्त्व नाही. परंतु, एकनाथ शिंदेंच्या डोक्यात हमास आणि धमास भरलंय.
खासदार संजय राऊत म्हणाले, या हमासच्या गोष्टी तुम्ही २०२४ मध्ये करा. कारण, तेव्हा तुम्ही सत्तेत नसणार. काल दसरा होता, सर्वांसाठी शुभ दिवस होता. त्याच दिवशी तुम्ही या असल्या गप्पा मारता. तुमची विचारसरणी काय आहे ती यातून कळते. तुम्ही महाराष्ट्रात हमास, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल्लाह, अल-कायदाचं नाव घेता. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. तुम्हाला मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवलं, तुम्ही त्यांना हमास म्हणताय. यातून तुमच्या डोक्यात भाजपाने किती घाण किडे भरलेत ते दिसतंय.
हे ही वाचा >> गिरीश महाजनांचा फोन का उचलला नाही? मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना नुसतं…”
संजय राऊत म्हणाले, मी तुम्हालाही (एकनाथ शिंदे) खूप काही बोलू शकतो. परंतु, माझ्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. म्हणून मी बोलत नाही. परंतु, तुम्ही भाजपासमोर गुडघे टेकताय. या गद्दारांच्या मेळाव्यात शिंदे म्हणाले मोदींचे हात बळकट करा. बाळासाहेब ठाकरे नेहमी देश मजबूत करा, महाराष्ट्र मजबूत करा असं म्हणायचे. परंतु, शिंदेंचं पूर्ण भाषण बघा, केवळ भाजपाला मजबूत करा, मोदींना मजबूत करा, नड्डांना मजबूत करा, फडणवीसांना मजबूत करा, असंच सगळं सुरू होतं. त्यामुळे हा मेळावा कोणाचा होता तेच कळत नव्हतं. मेळावा हा कार्यकर्त्यांना दिशा देणारा असतो. परंतु, यांच्या मेळाव्याला भाड्याने आणलेले लोक होते. भाजपाने पाठवलेले लोक होते. त्यामुळे त्यांच्यासमोर ‘मोदी की जय’, ‘भाजपा की जय’, ‘फडणवीस की जय’ हे तुम्हाला म्हणावंच लागेल. यांच्यावर कसले दिवस आलेत ते पाहा.