शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये बुधवारी चार आमदारांची नव्याने भर पडल्याने त्यांना ३७ आमदार फोडण्यात यश आल्याची माहिती समोर येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार दोन तृतीयांश आमदार मूळ पक्षातून बाहेर पडल्यास अपात्रतेची कारवाई होत नाही. यामुळेच शिवसेनेतील ३७ किंवा त्यापेक्षा अधिक आमदार बाहेर पडावेत या दृष्टीने नियोजन सुरु होतं. याच प्रयत्नांना यश आल्याचा दावा केला जात असून आज एकनाथ शिंदे राज्यपालांकडे भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यासाठी भेटीची वेळ मागतील असं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार
आजच राज्यपालांना पत्र देण्याचा प्रयत्न…
बुधवारी मंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम हे शिवसेनेचे दोन आमदार तसेच मंजूळा गावित आणि चंद्रकांत पाटील हे दोन अपक्ष शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या गोटात दाखल झाले. ३७ आमदारांची संख्या झाल्यावरच पुढील हालचाली केल्या जातील, असं सांगण्यात आलेलं. गुरुवारी सकाळपासूनच दादरचे शिवसेना आमदार सदा सरवणकर हे नॉट रिचेबल आहेत. त्याप्रमाणे कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर सुद्धा संपर्कात नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे हे आमदार सुद्धा शिंदे गटासोबत जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> ठाकरे सरकार भ्रष्टाचारी, अडीच वर्षांपासून त्यांच्यामुळे…; एकनाथ शिंदेंसोबतच्या ३४ शिवसेना आमदारांचा धक्कादायक दावा
याच पार्श्वभूमीवर शिंदेंकडे केवळ शिवसेनेचे ३७ किंवा त्याहून अधिक आमदार असतील. त्यामुळेच आज दिवसभरामध्ये ते भाजपाला पाठिंबा दर्शवण्यासंदर्भातील पत्र राज्यपालांना देण्यासंदर्भात अथवा सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा देण्याबाबतची चर्चा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे आजच भाजपाला पाठिंबा देणारं पत्र राज्यपालांना देण्याच्या प्रयत्नात असतील असं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.
नक्की वाचा >> “शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळे कायमचे…”, सेनेकडून बंडखोरांना इशारा; संबंध नाकारणाऱ्या भाजपाला म्हणाले, “पेच-डावपेच…”
सर्वात मोठा प्रश्न…
सध्या शिवसेनेतील आणखी आमदार शिंदे गटात सहभागी व्हावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शिंदे हे शिवसेना आमदारांशी संपर्क साधत आहेत. याशिवाय भाजपाकडून पुरेसे संख्याबळ व्हावे यासा ठी प्रयत्न सुरू आहेत. जळगाव आणि धुळ्यातील दोन अपक्ष आमदारांना गुवाहटीत नेण्यासाठी भाजपाच्या एका नेत्याने पुढाकार घेतला होता. मात्र एकीकडे शिंदे आकड्यांची जुळवाजुळव करत असतानाच विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करताना हे आमदार शिंदेंच्या बाजूने राहतात की नाही हा सर्वात मोठा आणि निर्णायक प्रश्न ठरणार असल्याचं जाणकार सांगतात.
नक्की वाचा >> विश्लेषण : ठाकरे सरकार पडलं तर कशी असतील सत्तास्थापनेची समीकरणं?
३७ आकड्यासाठी शिंदे विरुद्ध शिवसेना…
शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली हे कायदेशीरदृष्ट्या सिद्ध करण्याकरिता ३७ आमदारांची आवश्यकता आहे. ३७ आमदारांच्या स्वाक्षऱ्या प्राप्त झाल्यावर शिंदे यांच्याकडून राज्यपालांकडे पत्र दिले जाईल. या पत्रात स्वतंत्र गट स्थापन करण्यात आल्याचा दावा केला जाईल. पुढील एक दोन दिवसांत ही प्रक्रिया केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची संख्या ३७ होऊ नये म्हणून शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र सध्या तरी या प्रयत्नांना यश येतानाचं चित्र दिसत नाहीय.
नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी
गोवामार्गे मुंबईत येणार
विधान परिषद निवडणूक पार पडल्यावर सोमवारी रात्री शिंदे व त्यांच्याबरोबरील आमदारांनी सूरत गाठली होती. मंगळवारी दिवसभर हे आमदार सूरतमध्ये होते. तेथे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे शिंदे यांच्या भेटीसाठी पोहचले होते. सूरतमध्ये आमदारांना ठेवणे धोक्याचे आहे हे लक्षात आल्याने बुधवारी पहाटे या आमदारांना भाजपाची सत्ता असलेल्या आसामची राजधानी गुहावटीमध्ये विशेष विमानाने हलविण्यात आले. पुरेशा आमदारांचे संख्याबळ निश्चित झाल्यावर या सर्व आमदारांना मुंबईला आणण्यात येईल. त्याआधी गोव्यात नेण्याची योजना आहे.