पुण्यातील आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ढोलताशा वाजवून मुंबईकडे परतत असलेल्या झांज पथकाच्या बसचा शनिवारी पहाटे ( १५ एप्रिल ) खोपोली येथील बोरघाटात भीषण अपघात झाला. ही बस रस्त्याच्या कडेला असणारे रेलिंग तोडून थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २३ जण जखमी झाले आहेत. या जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जात भेट घेतली. तसेच, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, “झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ही झांज पथकातील मुले होती. रुग्णालयात दोन जखमी मुलांशी संवाद साधला. यातील एकाने म्हटलं, ‘बस वेगाने चालवली जात होती. वाहन चालकाला हळू चालवण्याबाबत हटकलं देखील होतं. तरीही त्याने ऐकलं नाही’,” अशी आपबीती मुलाने सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
“गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबाबत माहिती घेतली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपायांसाठी राष्ट्रीय महामार्गाशी चर्चा करणार आहे. राज्यात घडलेले अनेक अपघात पहाटेच्या सुमारास झाले आहेत. याबाबत काय उपाययोजना करण्यात येतील, यासाठी तीन उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या आहेत,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
नेमका अपघात कसा घडला?
शनिवारी पहाटेच साडेचार वाजण्याच्या सुमारा ही घटना दुर्घटना घडली. मुंबई गोरेगाव येथील बाजीप्रभु झांज पथक पुणे येथील एका समारंभासाठी गेले होते. समारंभ आटपून रात्री एकच्या सुमारास हे पथक पुन्हा मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागले. यावेळी बोरघाटात त्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एका अवघड वळणावर ही बस सुमारे तीनशे फुट खोल दरीत कोसळली. त्यात बसचा चक्काचूर झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे पथक, आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, यशवंती हायकर्स मदतीसाठी दाखल झाले होते.