Eknath Shinde महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उशिरा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट होती का? मनसे आणि शिवसेना यांची युती होणार का? महायुतीतला चौथा भिडू राज ठाकरेंचा मनसे पक्ष असणार का? या चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“गेल्या एक ते दोन महिन्यांपासूनच राज ठाकरेंना भेटायचं होतं. जेवायला या, भेटू, गप्पा मारु असं आमचं सुरु होतं. त्याप्रमाणे आम्ही भेटलो, स्नेहभोजन झालं. गप्पागोष्टी झाल्या. आमची सदिच्छा भेट झाली. बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. बाळासाहेबांचे अनुभव, राज ठाकरेंचे अनुभव यावर चर्चा केली. आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, एकत्र काम केलं आहे. त्यामुळे अनेक आठवणी निघाल्या, चर्चा झाल्या अनेक जुन्या घटना यावरही गप्पा झाल्या. या गप्पांमध्ये इतका वेळ कसा गेला ते समजलं नाही. आमची सदिच्छा भेट होती. याचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पोटात एक आणि ओठात एक असं करणारे आम्ही नाही-एकनाथ शिंदे
यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “सरकारचं कामकाज कसं चाललंय? मुंबईतल्या रस्त्यांचं काम कुठवर आलंय या विकासाच्या गोष्टींवरही चर्चा झाली. राजकीय चर्चा कुठलीही झाली नाही. गप्पागोष्टी आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात वेळ कसा गेला समजलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण विश्वास ठेवा. आम्ही मोकळेपणाने बोलणारे लोक आहोत. मनात एक, पोटात एक, ओठात एक असं आम्ही करत नाही. जे बोलतो ते थेट बोलतो.”
आम्हाला निवडणुकीची वेगळी तयारी करावी लागत नाही-एकनाथ शिंदे
“महायुतीचं सरकार आहे, आम्ही महायुतीत आहोत. येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल असं मी तर जाहीरपणे अनेकदा सांगितलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जे काम केलं त्याची पोचपावती मिळाली. यापुढेही येत्या निवडणुकांमध्ये महायुती चांगलं यश मिळवेल. त्यामुळे महायुती आहेच. निवडणुका नाहीत, त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करायची आत्ताची वेळ नव्हतीच. निवडणुका आल्या तरीही आम्ही तयारीतच असतो. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम करत नाही. निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालयं उघडायची असं आम्ही करत नाही. त्यामुळे निवडणुका असुद्या नसुद्या, आम्ही लोकांची कामं करत असतो. निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही.” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्ध ठाकरेंना लगावला.
निवडणुका नाहीत त्यामुळे…
“आता निवडणुका नाहीत त्यामुळे निवडणुकांचा माहोल तयार झालं की मग युती, महायुती यांची चर्चा होते. आज राज ठाकरेंशी सदिच्छा भेट घेतली. बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना आम्ही दोघांनी उजाळा दिला. आम्ही पुन्हा त्या काळात गेलो. भेटीत काही लपवून ठेवण्याचं कारण नाही. बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी, केलेलं काम, त्या काळातल्या घटना या सगळ्यांना आम्ही उजाळा दिला. काही चिंता करु नका. काही असेल तर तुम्हाला आम्ही नक्की कळवू” असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd