खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. पक्ष आणि चिन्हही त्यांचंच आहे असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. तसंच भरत गोगावलेंचा व्हीप वैध आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. यापाठोपाठ १६ आमदारांपैकी एकालाही अपात्र करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे या कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे.
१६ पैकी एकाही आमदाराला अपात्र करता येणार नाही
१६ पैकी एकाही आमदाराला अपात्र करता येणार नाही असं आज राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकाल वाचना दरम्यान म्हटलं आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, लता सोनावणे, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. तसंच याचिकाही दाखल केली होती. याबाबत निर्णय देत असताना एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
राहुल नार्वेकर यांनी मांडलेले पाच मुद्दे
१. शिंदे गट खरी शिवसेना आहे.
२. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते.
३. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते.
४. ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.
५. सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे.
ठाकरे गटानं युक्तिवाद केल्याप्रमाणे पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय मानला जायला हवा. पण त्यासंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे हे मान्य करण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे हा मुद्दा अमान्य केला जात आहे. त्यामुळे पक्षातून किंवा पदावरून कुणाला काढण्यासंदर्भातले पक्षप्रमुखांना असणारे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसारच त्यांनी घ्यायला हवेत, असं शिवसेनेच्या पक्ष घटनेत नमूद केलं आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पदावरून काढण्याचा अधिकार नाही असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.