Eknath Shinde and Ajit Pawar CM Post : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या सरकारकडून विरोधकांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. मात्र, या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मिश्कील वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या मिश्कील वक्तव्यावर बोलताना अजित पवारांनीही हजरजबाबीपणा दाखवत चांगलीच फिरकी घेतली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले

“राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. आता महायुतीच्या सरकारचं हे दुसरं अधिवेशन आहे आणि निवडणुकीनंतर सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारची नवीन टर्म असली तरी टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) खुर्चीची आदलाबदल झाली आहे. पण अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे”, असं मिश्कील वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमची टीम जुनीच आहे, फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्या बदलल्या आहेत, पण अजित पवारांची खुर्ची फिक्स असल्याचं मिश्कील वक्तव्य करत टोला लगावला. यावर लगेचच अजित पवार यांनीही उत्तर दिलं. “तुम्हाला (एकनाथ शिंदे) खुर्ची (मुख्यमंत्री पदाची खुर्ची) फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू”, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंची फिरकी घेतली.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवार यांनी तातडीने उत्तर देत फिरकी घेतली आणि पत्रकार परिषदेत मोठा हशा पिकला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील खळखळून हसल्याचं पाहायला मिळाले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की आमची रोटेटिंग चेअर चेअर आहे.

Story img Loader