Mahayuti Politics : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. खरं तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज जवळपास पाच दिवस झाले पण अद्यापही सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी नेमकी अडचणी काय आहेत? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका घेतली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर करत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं जाहीर केलं. त्यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याचं मानलं जातं. मात्र, नेमकं मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा अद्याप झालेली नाही. पण मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे.

हेही वाचा : “मुख्यमंत्रिपद नशिबात असावं लागतं”, शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्रिपदावरून अजित पवारांना डिवचलं

या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत महाराष्ट्रातील या तीन्ही नेत्यांची गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याबरोबर महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीचं सरकार कसं असणार? मंत्रिमंडळ कसं असणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? अशा विषयावर सविस्तर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार? याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत पोहोचताच शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

दरम्यान, एकनाथ शिंदे हे थोड्यावेळापूर्वी बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले. यावेळी दिल्लीत पोहोचताच त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ‘कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी मोठं आहे’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यांच्या या सूचक विधानामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“आता बैठकीसाठी मी जात आहे. बैठकीत जी काही चर्चा होईल ते मी सांगणार आहे. आमची बैठक सकारात्मक होईल. काल देखील मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली. आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही. लाडक्या बहिणींबाबत देखील मी पत्रकार परिषदेत बोललो. आता लाडक्या बहिणींचा भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे. लाडका भाऊ ही ओळख माझ्या सर्व पदापेक्षा मोठी आहे. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळासह सविस्तर चर्चा होईल आणि बैठकीत काय चर्चा झाली हे देखील सांगेल. अजित पवार हे देखील बैठकीला येणार आहेत. ते आधी आल्यामुळे त्यांची पक्षांची बैठक झाली असेल”, असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde on chief ministership in maharashtra mahayuti politics ajit pawar devendra fadnavis and maharashtra assembly election 2024 gkt